Advertisement Advertisement

समृद्धी महामार्गावर शिक्षकाची विष प्राशन करून आत्महत्या; सिंदखेडराजा तालुक्यात हळहळ….

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तालुक्यातील झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक जगन्नाथ मधुकर शिंदे (वय ४०) यांनी शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी समृद्धी महामार्गावरील तढेगाव फाट्याजवळ विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शिक्षकवर्गासह परिसरात शोककळा पसरली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन्नाथ शिंदे हे झोटिंगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच ते तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सुमारे आठ वर्षे संचालक राहिले होते.

मलकापूर पांगरा येथे त्यांचे कृषी सेवा केंद्र व भुसार मालाचे दुकानही असून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडले. त्यांनी कृषी सेवा केंद्र उघडल्यानंतर तेथून विषारी औषध घेतले आणि आपल्या चारचाकी वाहनाने समृद्धी महामार्गावरील तढेगाव फाट्याजवळ जाऊन त्याचे प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी त्यांचा मुलगा आला असता वडील दुकानात नसल्याने त्याने शोधाशोध सुरू केली. त्यावेळी समृद्धी महामार्गावरील तढेगाव फाट्याजवळ त्यांची कार उभी असल्याचे दिसून आले. घटनास्थळी ते विषारी औषध घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी सिंदखेडराजा येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणाची नोंद किनगाव राजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मुंडे पुढील तपास करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!