चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील काटोडा शिवारात दोन प्रौढ बिबटे आणि एका पिल्लाचा वावर आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० जुलै रोजी सकाळी शेतकरी वसुदेव ढोरे यांच्या गोठ्यात बांधलेल्या गायीवर बिबट्यांनी हल्ला करून तिला ठार केल्याची घटना उघडकीस आली. गायीला गोठ्यापासून सुमारे ७०० ते ८०० फूट अंतरावरील धरण परिसरात फरफटत नेल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरून स्पष्ट झाले.
यापूर्वी २९ जुलै रोजी परिसरातील ग्रामस्थांना दोन मोठे आणि एक लहान असे तीन बिबटे दिसल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षदर्शी सरला शिवदास लहाने यांनी ही माहिती दिल्यानंतर प्रदीप भानुदास थिंगळे यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अंचरवाडी बीटचे वन कर्मचारी जी. एम. पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचांसमक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी ठशांची नोंद घेत छायाचित्रण केले. प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ आणि पंचांच्या उपस्थितीत पंचनामा पूर्ण करण्यात आला.
दरम्यान, सध्या शेतात निंदणी, कोळपणी आणि फवारणीची कामे सुरू असल्याने शिवारात मोठ्या प्रमाणावर शेतकरी, महिला आणि मजुरांची वर्दळ आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. पहाटे, सायंकाळी आणि रात्री एकटे शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे शिवारात पाठवू नये तसेच बिबट्या दिसल्यास त्याचा पाठलाग किंवा आरडाओरड न करता तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.














