खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): कर्जमाफीच्या यादीबाबत माहिती विचारण्यासाठी गेलेल्या शेतकरी प्रतिनिधी आणि बँक व्यवस्थापक यांच्यात झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी संतापाच्या भरात बँक व्यवस्थापकाला थप्पड मारल्याची घटना खामगाव येथील सेंट्रल बँकेत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही शेतकऱ्यांसह अमोल पाटील हे सेंट्रल बँकेत गेले होते. त्यांनी बँक व्यवस्थापकांकडे कर्जमाफीच्या यादीची माहिती तसेच संबंधित प्रक्रियेबाबत विचारणा केली. मात्र, यावेळी व्यवस्थापकांनी उद्धटपणे वागणूक दिली आणि शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अमोल पाटील यांनी व्यवस्थापकांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना थप्पड मारली. यावेळी “शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी अरेरावी का करता?” असा जाबही त्यांनी विचारल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित बँक व्यवस्थापक यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात पोलिसांच्या तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.















