निमगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): नांदुरा तालुक्यातील पातोंडा जुने येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (२८ जुलै) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत नांदुरा पोलीस ठाण्यात सुपडा सिताराम कांडेलकर (वय ५०, रा. पातोंडा जुने, ता. नांदुरा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रीकृष्णा ज्ञानदेव कांडेलकर हे त्यांचे पुतणे होते. सकाळी मृतकाच्या पत्नीने घरी येऊन “माझ्या पतीने गळफास घेतला आहे,” अशी माहिती दिल्यानंतर सुपडा कांडेलकर व सोपान झाल्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घरात जाऊन पाहणी केली असता श्रीकृष्णा कांडेलकर यांनी राहत्या घरातील छताच्या लाकडी बल्लीला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती नांदुरा पोलिसांना देण्यात आली.
फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून नांदुरा पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोहेकॉ संदीप सोळंके यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
घटनेची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदुराचे उपसभापती पुरुषोत्तम झाल्टे, नांदुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच ओम साई फाउंडेशनचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत श्रीकृष्णा कांडेलकर यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा व अन्य आप्तस्वकीय असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पातोंडा जुनेसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.













