Advertisement Advertisement

वाढदिवसाला तलवारीने केक कापला; हवेत तलवार फिरवत दहशत, तिघांवर गुन्हा…

मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्युज): वाढदिवसाच्या उत्साहात कायद्याचा विसर पडल्याने मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून तसेच तलवार हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास वडगाव खंडोपंत येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर कुंदन दादाराव शेळके (वय २०) याचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. यावेळी भुषण दयाराम पाटील (वय ३२) आणि कुंदन शेळके यांनी एमएच-२८-एबी-३००१ क्रमांकाच्या दुचाकीवर केक ठेवून तलवारीने तो कापला.

याचवेळी गोविंदा रमेश पाटील (वय ३२) याने हातातील तलवार हवेत फिरवत परिसरात उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल प्रविण पडोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

तपासादरम्यान २४ जुलै रोजी दुपारी भुषण पाटील यांच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्याकडे बेकायदेशीरपणे ठेवलेली तलवार आढळून आली. तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचाही भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

हेड कॉन्स्टेबल प्रविण पडोळ यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अमोल खराडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!