चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज) : ग्राहकांना अत्याधुनिक आणि स्मार्ट सेवा देण्याचा दावा करणाऱ्या महावितरणच्या कारभारातील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार चिखली येथे समोर आला आहे. व्यावसायिक वापरासाठी नवीन वीजजोडणी मंजूर झाल्यानंतरही संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष वीजमीटर बसविण्यात आले नाही. मात्र, मीटरच नसताना तब्बल ८३ युनिट वीज वापरल्याची नोंद करून ग्राहकाला १,६३० रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चिखलीतील जुने गाव, चिंच परिसरातील रहिवासी हरिहर माधवराव सोळंके यांनी आपल्या व्यावसायिक आस्थापनासाठी नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केला होता. महावितरणने १७ जून २०२६ रोजी हा अर्ज मंजूर केला. मीटर बसविण्यासाठी दुकानात आवश्यक तयारीही करण्यात आली होती. मात्र, महिनाभर उलटूनही संबंधित अधिकाऱ्यांनी मीटर बसविण्याची कोणतीही कार्यवाही केली नाही.
दरम्यान, प्रत्यक्षात मीटर बसविण्यात आलेले नसतानाही महावितरणच्या संगणक प्रणालीमध्ये संबंधित ग्राहकाने ८३ युनिट वीज वापरल्याची नोंद करण्यात आली. त्याआधारे थेट १,६३० रुपयांचे वीजबिल ग्राहकाला पाठविण्यात आले. मीटरच नसताना वीज वापराची नोंद कशी झाली, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेमुळे महावितरणच्या विविध विभागांतील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. एक विभाग नवीन जोडणी मंजूर करतो, दुसरा मीटर बसविण्याची जबाबदारी पार पाडत नाही, तर तिसरा विभाग प्रत्यक्ष वापर नसतानाही वीजबिल तयार करतो. अशा हलगर्जी कारभारामुळे ग्राहकांना आर्थिक आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेचा गाजावाजा सुरू असताना चिखलीतील हा प्रकार प्रशासनाच्या दाव्यांनाच छेद देणारा ठरत आहे. ग्राहकांना आधुनिक सेवा देण्यापूर्वी महावितरणने स्वतःची कार्यपद्धती पारदर्शक आणि जबाबदार बनवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, चुकीचे वीजबिल तातडीने रद्द करावे आणि ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी हरिहर माधवराव सोळंके यांच्यासह नागरिकांनी केली आहे.















