Advertisement Advertisement

पत्नीला मारहाण करणाऱ्या मेव्हण्याला जाब विचारायला गेलेल्या शालकावर चाकूने हल्ला; मेहकरात गुन्हा दाखल…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मेव्हण्याला समजावण्यासाठी गेलेल्या शालकावर चाकूसदृश धारदार वस्तूने हल्ला करण्यात आल्याची घटना १८ जुलै रोजी रात्री मेहकर शहरात घडली. या हल्ल्यात शालक गंभीर जखमी झाला असून, आरोपीविरुद्ध मेहकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक गणेश चव्हाण (वय २३, रा. इंदिरानगर, मेहकर) यांची बहीण शुभांगी हिचा विवाह स्वप्नील संजय वाकडे (रा. एरंडा, ता. पुसद, जि. यवतमाळ) याच्याशी झाला आहे. दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगा असून ते सध्या मेहकर येथे वास्तव्यास आहेत. स्वप्नील याला मद्यपानाचे व्यसन असून, तो पत्नीला वारंवार मारहाण व शिवीगाळ करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१८ जुलै रोजी रात्री सुमारे १०.३० वाजता शुभांगी हिने भावाला फोन करून पती दारूच्या नशेत मारहाण करत असून जीवे मारण्याची धमकी देत असल्याची माहिती दिली. त्यानंतर कार्तिक चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहोचला. यावेळी स्वप्नील वाकडे याने संतापाच्या भरात शिवीगाळ करत चाकूसदृश धारदार वस्तूने कार्तिकच्या पोटावर वार केला. या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर आरोपीने पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड होताच त्याने फिर्यादीच्या दिशेने मोबाईल फेकला आणि घटनास्थळी उभी असलेली एमएच-२८-बीव्ही-३९०९ क्रमांकाची मोटारसायकल घेऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाला.

जखमी कार्तिक चव्हाण याच्यावर मेहकर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी आरोपी स्वप्नील संजय वाकडे याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुखदेव विक्रम ठाकरे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!