अमरावती (बुलढाणा कव्हरेज न्यूज): वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी हत्येच्या थरारक प्रकरणाचा शहर गुन्हेशाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत पाच मुख्य आरोपींना अटक केली आहे. जुन्या वैमनस्यातून मित्रांनीच दोन युवकांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार (१९ जुलै) रात्री सुमारे ९.३० वाजता आरोपींनी संजोग जोशी आणि त्याचा मित्र ऋतिक पंडित यांना घरी जाऊन बोलावले. त्यानंतर दोघांना दुचाकीवर बसवून वलगाव बसस्थानक परिसरात नेण्यात आले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या साथीदारांनी दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजोग जोशी आणि ऋतिक पंडित यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
तपासादरम्यान आरोपींनी जुन्या वादातून आणि बदला घेण्याच्या उद्देशाने हा कट रचल्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक संजोग जोशी आणि आरोपी विक्की ऊर्फ गोलू विकास उगले यांच्यात यापूर्वीपासून वाद होता. त्यातूनच ही दुहेरी हत्या घडल्याचे समोर आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. रात्रभर शोधमोहीम राबवून अवघ्या २४ तासांच्या आत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विक्की ऊर्फ गोलू विकास उगले (२९), मिलन गोपालराव तायवाडे (२९), अजय दिलीपराव नागरगोजे (२९), अंकित विलास मेश्राम (२९) आणि सुमित सुधाकर सुरुजुसे (१९) यांचा समावेश आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ४९ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पुढील तपासासाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक, वलगाव पोलीस ठाणे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, सहपोलीस आयुक्त श्याम घुगे, अप्पर पोलीस आयुक्त प्रज्वल सोनटक्के तसेच गुन्हेशाखेचे वरिष्ठ अधिकारी कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.













