सिंदखेड राजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण प्रशासनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या पोलीस पाटील व्यवस्थेवर मनुष्यबळाच्या कमतरतेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पोलीस पाटलांची एकूण १ हजार २१० पदे मंजूर असताना त्यापैकी केवळ ६९२ पदांवर पोलीस पाटील कार्यरत आहेत. तब्बल ५१८ पदे रिक्त असल्याने अनेक पोलीस पाटलांवर दोन-दोन गावांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
पोलीस पाटील हा गावपातळीवरील प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा मानला जातो. पोलीस, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वन, निवडणूक तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटलांवर असते. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी व अवैध धंद्यांबाबत प्रशासनाला माहिती देणे, सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य करणे तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सहकार्य करणे, अशी विविध कामे त्यांना करावी लागतात. मात्र, मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने कार्यरत पोलीस पाटलांना अतिरिक्त गावांचा कारभार सांभाळताना वेळ, प्रवास आणि प्रशासकीय समन्वयाची मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी स्वतंत्र मानधन किंवा प्रवास भत्त्याची व्यवस्था नसल्याने पोलीस पाटलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
उपविभागनिहाय आकडेवारीनुसार, मलकापूर उपविभागात सर्वाधिक ११० पदे रिक्त आहेत. सिंदखेडराजा येथे ९८, मेहकर ९०, खामगाव ७७, जळगाव जामोद ७६, तर बुलढाणा उपविभागात ६७ पदे रिक्त आहेत. गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने जिल्ह्यातील सर्व ५१८ रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. तसेच अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांना स्वतंत्र मानधन, प्रवास भत्ता व आवश्यक सुविधा देऊन प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण सुरक्षेसाठी रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असून, योग्य मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाचा गावपातळीवरील समन्वय अधिक प्रभावी होऊन नागरिकांना जलद व सक्षम सेवा मिळण्यास मदत होईल, असे मत माजी पोलीस पाटील सय्यद रफीक यांनी व्यक्त केले.
उपविभागनिहाय पोलीस पाटील पदांची स्थिती : बुलढाणा—मंजूर २२१, कार्यरत १५४, रिक्त ६७; सिंदखेडराजा—मंजूर १६१, कार्यरत ६३, रिक्त ९८; मेहकर—मंजूर २१५, कार्यरत १२५, रिक्त ९०; खामगाव—मंजूर १८८, कार्यरत १११, रिक्त ७७; मलकापूर—मंजूर २६५, कार्यरत १५५, रिक्त ११०; जळगाव जामोद—मंजूर १६०, कार्यरत ८४, रिक्त ७६. जिल्ह्यात एकूण १ हजार २१० पदे मंजूर असून ६९२ पदे कार्यरत, तर तब्बल ५१८ पदे रिक्त आहेत.













