Advertisement Advertisement

अवैध वाळू उपशाचा थरार! बुडालेली बोट काढताना मजुराचा मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाच्या प्रकारात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुडालेली बोट बाहेर काढण्यासाठी अधिक मजुरीचे आमिष दाखवून मजुरांना पाण्यात उतरविण्यात आले. मात्र, बोट बाहेर काढण्याच्या प्रयत्नादरम्यान एका मजुराचा बोटीखाली दबून मृत्यू झाला. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा–पिंपळगाव कुडा गावालगत असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीपात्रात घडली. या परिसरातून बोटीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्या कारवाईची चाहूल लागताच संबंधितांनी वापरात असलेली बोट नदीत बुडवून घटनास्थळावरून पलायन केल्याची चर्चा आहे.

त्यानंतर बुडालेली बोट बाहेर काढण्यासाठी गुंजाळा येथील तीन मजूर व आणखी एका मजुराला जास्तीच्या मजुरीचे आमिष दाखवून नदीपात्रात उतरविण्यात आले. बोट बाहेर काढण्याचे काम सुरू असताना तिघे मजूर सुरक्षित बाहेर आले. मात्र राजेंद्र आश्रुजी इलग हे पाण्याबाहेर आले नाहीत.

बराच वेळ शोध घेऊनही ते न सापडल्याने त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनीही शोधमोहीम राबविली; मात्र त्यात यश आले नाही. घटनेनंतर सुमारे २४ तास उलटल्यानंतरही राजेंद्र इलग यांचा शोध न लागल्याने त्यांच्या मुलाने किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यंत्राच्या सहाय्याने नदीपात्रातील बुडालेली बोट बाहेर काढण्यात आली. त्यावेळी बोटीखाली दबलेल्या अवस्थेत राजेंद्र आश्रुजी इलग यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर पोलिसांनी संशयाच्या आधारावर तिघांना ताब्यात घेतले असून अवैध वाळू उपसा, निष्काळजीपणा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाबींचा सर्वंकष तपास सुरू केला आहे. तसेच या प्रकरणात संबंधित वाळू माफिया आणि जबाबदार व्यक्तींवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!