Advertisement Advertisement

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? डोळ्यांच्या संसर्गाचा वाढतोय धोका; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): पावसाळ्यात वातावरणातील वाढलेली आर्द्रता, धूळ, बुरशी आणि साचलेल्या पाण्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषतः कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञांनी दिला आहे.

पावसाळ्यात चष्म्याच्या काचांवर पाण्याचे थेंब साचणे, धुके येणे आणि वारंवार काचा पुसाव्या लागणे यामुळे अनेक चष्मेधारक त्रस्त होतात. त्यामुळे सोयीसाठी अनेक जण कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करण्यास प्राधान्य देतात. मात्र, याच काळात लेन्सची योग्य स्वच्छता न ठेवल्यास डोळ्यांना गंभीर संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पावसाळ्यात हवेत आर्द्रता अधिक असल्याने लेन्सवर जिवाणू, विषाणू आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत दूषित लेन्स डोळ्यांत वापरल्यास डोळे लाल होणे, खाज सुटणे, सतत पाणी येणे, टोचल्यासारखे वाटणे आणि दृष्टी धूसर होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संदेश राठोड यांनी सांगितले की, “पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे सुरक्षित असले तरी त्यासाठी स्वच्छता आणि योग्य निर्जंतुकीकरणाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. लेन्स वापरताना कोणतीही निष्काळजीपणा डोळ्यांच्या संसर्गास कारणीभूत ठरू शकतो.”

डोळ्यांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसताच त्वरित कॉन्टॅक्ट लेन्स काढून नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच शक्य असल्यास पावसाळ्यात चष्म्याचा वापर करावा किंवा लेन्स वापरताना स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!