खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोयाबीन बियाण्याबाबत भ्रामक दावे करून शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी रवी सीड्स अँड रिसर्च प्रा. लि., ताराविला (ता. अलोट, जि. रतलाम, मध्यप्रदेश) या कंपनीविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
कृषी विभागाकडे संबंधित कंपनीच्या सोयाबीन बियाण्याच्या उगवणीबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार कृषी विभागाने बियाण्यांच्या पिशव्यांची तपासणी केली असता, त्यावर “रवीचे बियाणे… अस्सल सोन्याचे नाणे” असा दावा करण्यात आल्याचे आढळून आले.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची दिशाभूल करणारी जाहिरात बियाणे नियम, १९६८ मधील नियम १० व २३ यांच्या तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे. संबंधित बियाणे हे सत्यता दर्शक (Truthfully Labelled) बियाणे असल्यामुळे त्याच्या उत्पादन, पॅकिंग व सीलिंग प्रक्रियेत कोणत्याही शासकीय प्रमाणिकरण संस्थेचा सहभाग नसतो. त्यामुळे या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी उत्पादक कंपनीवरच असते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी खामगाव तालुका कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) अमोल बंड यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील कलम ३ व ७, बियाणे नियम, १९६८ मधील नियम १० व २३ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन रहाटे करीत आहेत. कृषी विभागाच्या या कारवाईमुळे भ्रामक जाहिराती करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा इशारा मिळाल्याचे मानले जात आहे.












