दाताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोताळा तालुक्यातील शेलगाव बाजार येथील मोहगंगा नदी परिसरातील पाझर तलावाच्या पाण्यातून बैलगाडीने शेतात जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ६० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना १८ जुलै रोजी घडली. या घटनेमुळे शेलगाव बाजार परिसरात शोककळा पसरली आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव अनिल पुंजाजी खर्चे (वय ६०, रा. शेलगाव बाजार, ता. मोताळा) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल खर्चे हे नेहमीप्रमाणे बैलगाडीने आपल्या शेताकडे जात होते. शेतात जाण्यासाठी त्यांना मोहगंगा नदी परिसरातील पाझर तलावाच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत होता. मात्र, त्या ठिकाणी पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांनी बैलगाडीसह नदीपात्रात प्रवेश केला. त्यावेळी अचानक बैलगाडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
दरम्यान, अनिल खर्चे हे दुपारपर्यंत घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला. शनिवारी दुपारी गावातील तरुणांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. शोधादरम्यान काही अंतरावर बैलगाडी अडकलेल्या अवस्थेत दिसून आली. बैलगाडीमध्येच अनिल खर्चे अडकलेले आढळले. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातात बैलगाडीला जुंपलेले दोन्ही बैल मात्र सुखरूप बचावले.
घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे शेलगाव बाजार गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनिल खर्चे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.












