मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बु. परिसरात शेतात वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय विवाहितेवर दोन अज्ञात व्यक्तींनी कोयता व विळ्याचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधलगाव बु. येथील लोणवडी शिवारातील एका शेतात मध्यप्रदेशातील आदिवासी पावरा समाजातील कुटुंब शेतमजुरीसाठी वास्तव्यास आहे. १७ जुलैच्या मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास १९ वर्षीय पीडिता आपल्या पतीसोबत झोपडीत मोबाईल पाहत असताना दोन अज्ञात इसम तेथे आले.
आरोपींनी कोयता व विळा दाखवून पीडितेच्या पतीला धमकावत पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला जबरदस्तीने झोपडीच्या बाजूला नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक, खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश महल्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पीडितेच्या जबाबावरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.












