चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कर आकारणीविरोधात शिवसेनेने शुक्रवारी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य नागरिकांवर अन्यायकारक कर वाढ लादण्यात आल्याचा आरोप करत कर आकारणीचा तात्काळ पुनर्विचार करावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
शहरातील नागरिकांना नुकत्याच वितरित करण्यात आलेल्या मालमत्ता कराच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. आधीच महागाई, बेरोजगारी, वाढती वीजबिले तसेच शिक्षण आणि आरोग्यावरील वाढत्या खर्चामुळे नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असताना नगर परिषदेकडून करण्यात आलेली कर वाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असल्याचे शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे.
शिवसेनेने नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगर परिषदेचे कार्यक्षेत्र वाढले असले तरी शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी आणि स्ट्रीट लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा अद्यापही अपुऱ्या असल्याचे सांगत, सुविधा न देता कर वाढ करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, नगर परिषदेकडून ३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यानंतर दरमहा दोन टक्के शास्ती आकारली जाणार असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला.
शिवसेनेने नगर परिषद प्रशासनाकडे वाढीव कर आकारणीचा तात्काळ पुनर्विचार करावा, कर वाढीचे निकष व सूत्र जाहीर करावेत, नागरिकांच्या हरकती ऐकण्यासाठी विशेष लोकसुनावणी घ्यावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीयांना विशेष सवलत द्यावी, कर भरण्याची मुदत वाढवावी तसेच पुनर्विचार पूर्ण होईपर्यंत वाढीव कर आणि शास्तीची अंमलबजावणी स्थगित करावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.
हे निवेदन शिवसेना चिखली शहरप्रमुख विलास घोलप यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, शिवसेना नेते कपिल खेडेकर, तालुकाप्रमुख गजानन मोरे, माजी शहरप्रमुख निलेश अंजनकर, विठ्ठल जगदाळे, अनमोल ढोरे, गजानन पवार, युवासेना शहरप्रमुख राजेश पवार, कल्पनाताई बोधेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.













