मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन अधिक तीव्र होत आहे. पीक विमा, संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर आज (१९ जून) सकाळी १० वाजता चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली.यावेळी शेतकऱ्यांची सरसगट कर्जमुक्ती झालीच पाहिजेत,शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळालाच पाहिजे यासह घोषणा देण्यात आल्या
आंदोलनादरम्यान शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी बोलताना सांगितले की, “आम्ही शेतकरी सध्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. मात्र शासनाने आमच्या मागण्यांची त्याचप्रमाणे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर पुढील काळात बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरू आणि आंदोलन अधिक तीव्र करू.”असा इशारा त्यांनी दिला
आंदोलनकर्ते शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये विनायक सरनाईक, भानुदास घूबे,गणेश थुट्टे, सुनील मिसाळ, भागवत थुट्टे, विनोद थुट्टे,विशाल थुट्टे,सुनिल खेडेकर यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांचा समावेश होता.
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला राज्यातील विविध भागांतून पाठिंबा वाढत असून, अनेक ठिकाणी रास्ता रोको, निदर्शने व इतर आंदोलनांच्या माध्यमातून शेतकरी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.













