बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सात वर्षीय चिमुकलीच्या लैंगिक छळप्रकरणी ७० वर्षीय आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटना घडून पंधरा दिवस उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाइकांनी केला आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई न केल्यास सात दिवसांनंतर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी शहरालगतच्या एका गावातील सात वर्षीय मुलगी आपल्या आजोबांसोबत गावातील धार्मिक स्थळी गेली होती. दर्शन करून परत येत असताना रस्त्यात गावातीलच ओळखीचा संपत शिवराम जाधव (वय ७०) हा भेटला. ओळखीचा असल्याने आजोबांनी त्याला स्कुटीवर बसविले. मुलगी दोघांच्या मध्ये बसली असताना आरोपीने तिचा कथित विनयभंग करून लैंगिक छळ केला आहे..
घरी परतल्यानंतर मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मात्र, गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. तसेच आरोपी व त्याच्या नातेवाईकांकडून खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने कुटुंब भयभीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपीला तातडीने अटक करून पीडित मुलीला न्याय द्यावा आणि धमक्या देणाऱ्यांविरुद्धही कारवाई करावी. अन्यथा सात दिवसांनंतर ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.












