चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : चिखली तालुक्यातील एकलारा–पेनसावंगी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष समाधान आकाळ यांनी दिला आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, चिखली यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एकलारा, पांढरदेव, पाटोदा, भोरसा, भोरसी, पेनसावंगी आणि नायगाव या गावांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले असले तरी दुसरी बाजू अद्याप अपूर्ण आहे.
रस्त्याचे काम रखडल्यामुळे सध्या या मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरू असून वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अनेकदा दोन-दोन तास वाहनांच्या रांगा लागत असल्याने शेतकरी, व्यापारी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच या मार्गावरील अपूर्ण कामामुळे एसटी बससेवाही प्रभावित झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
एकलारा–पेनसावंगी रस्त्याचे उर्वरित काम येत्या आठ दिवसांत पूर्ण करावे, अन्यथा चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाधान आकाळ यांनी दिला.
निवेदन देताना समाधान आकाळ यांच्यासह शिवनारायण म्हस्के, रामेश्वर भुसारी, एन.टी. भुसारी, भारत गवई, मदन आकाळ, देवेंद्र भुसारी, शेख सत्तार भाई, राजू गवई, अर्जुन गवई, अशोक गवई, गोपाळ गवई, रमेश गवई, प्रदीप पाटील, विष्णू आकाळ, जगन्नाथ गवई, कैलास गवई, सिधुबाई पवार, भिकुबाई कोरके, सुनिल शिराळे, सुरेश भागिले, तोताराम भुसारी, आत्माराम भुसारी, विजय गवई, बालाजी गव्हले, नारायण डुकरे, सखाराम भुसारी, भगवान आकाळ, समाधान कांबळे, संजय गवई, भानुदास गवई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते













