चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली ते मेहकर रोडवरील कोलारा फाटा परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला. मोटारसायकल आणि बोलेरो पिकअप यांच्यात जोरदार धडक होऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जबरदस्त होता की परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत युवक हा देऊळगाव घुबे येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. तो मोटारसायकलने मेहकरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातातील बोलेरो पिकअपचा क्रमांक MH 28 BB 3561 असा असून ती गाडी माल घेऊन चिखलीकडे येत होती. धडकेनंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. मृत युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.














