खुलताबाद ( कव्हरेज ग्रुप नेटवर्क) : खुलताबाद येथे एका २३ वर्षीय विवाहितेवर तिच्याच सासऱ्याकडून दीर्घकाळ अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली असून पती फरार झाला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे लग्न १९ डिसेंबर २०१९ रोजी झाले होते. ती पती, सासू-सासरे आणि तीन लहान मुलांसह खुलताबाद शहरात राहत होती. तिचा पती हॉटेलमध्ये नोकरी करत असून, त्याच्या नाईट ड्युटीच्या वेळेत आरोपी सासरा तिच्यावर वारंवार जबरदस्ती करीत असे.
सुरुवातीला सासऱ्याने वाईट नजरेने पाहणे सुरू केले होते. विरोध केल्यावर त्याने धमकावून तिला गप्प बसण्यास भाग पाडले. पती घरी नसताना तो तिच्या खोलीत येऊन अत्याचार करीत असल्याचा आरोप तिने केला आहे.
हा प्रकार पीडितेने सासूला सांगितला असता, तिनेही याकडे दुर्लक्ष करून कुठेही तक्रार न करण्याचा सल्ला दिला. पतीला सांगितल्यावर त्यानेही तिचे म्हणणे नाकारत वडिलांच्या बाजूने भूमिका घेतली आणि तिला जबरदस्ती सहन करण्यास भाग पाडले, असे तक्रारीत नमूद आहे.














