Advertisement Advertisement

हॉटेल ‘एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांचा छापा, तिघे ताब्यात…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील बायपास मार्गावरील ‘एकांत हॉटेल अँड लॉजिंग’ येथे सुरू असलेल्या देहव्यापारावर मेहकर पोलिसांनी रविवारी (१५ मार्च) धाड टाकून कारवाई केली. या छाप्यात कुंटणखाना चालवणाऱ्या एका इसमासह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, हॉटेल मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बायपासवरील अर्धवट बांधकाम असलेल्या ‘एकांत’ हॉटेलच्या तळघरात काही महिलांकडून देहव्यापार चालवला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचत एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. त्यानंतर देहव्यापार सुरू असल्याची खात्री पटताच, दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

या कारवाईत प्रमोद धनसिंग पवार (रा. बिबी, ता. लोणार) हा कुंटणखाना चालवताना रंगेहात आढळून आला. तसेच त्या ठिकाणी दोन महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १८३/२०२६ नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ६ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!