खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील एका परिसरातून ३४ वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला काही दिवसांपूर्वी आपल्या मुलासह माहेरी खामगाव येथे आली होती. दरम्यान, १३ मार्च रोजी दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास ती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. त्यानंतर ती परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.
कुटुंबीयांनी खामगाव शहरासह डोलारखेड, शेगाव तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र महिलेचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली असून पोलिसांकडे धाव घेण्यात आली आहे.
या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी हरवल्याची नोंद करून महिलेचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी संबंधित महिलेबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
















