चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सरबा फाट्यावर २२ फेब्रुवारी रोजी भीषण अपघात घडला. मद्यप्राशन अवस्थेत भरधाव वेगाने दुचाकी चालवत आलेल्या इसमाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ६५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून ती सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत गुंजाळा येथील जनाबाई नानाभाऊ केदार (वय ६५) या आपल्या मोठ्या मुलासोबत लग्नासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी दे मही येथे गेल्या होत्या. खरेदी करून परत लग्नसमारंभाकडे जात असताना पाडळी येथील गजानान परसराम शिंदे हा इसम मद्यप्राशन अवस्थेत नंबर नसलेली दुचाकी भरधाव वेगाने चालवत आला आणि समोरून येणाऱ्या त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेत जनाबाई रस्त्यावर आदळून गंभीर जखमी झाल्या.
घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने जखमींना जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत तात्काळ शस्त्रक्रिया केली. सध्या त्या कोमात असून मृत्यूशी झुंज देत आहेत. उपचारासाठी आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये खर्च झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
दरम्यान, नातेवाईक तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी “आपसात मिटवा” असा सल्ला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र महिला गंभीर अवस्थेत असतानाही गुन्हा नोंदवण्यात टाळाटाळ होत असल्याने नातेवाईकांत संताप व्यक्त होत आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















