साहेब, रखडलेले अनुदान द्या हो !घरकुलाच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांचा रायपूरात रास्ता रोको…..

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)“साहेब, रखडलेले अनुदान द्या हो…!” अशी आर्त हाक देत रायपूर येथील घरकुल लाभार्थ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बसथांब्यावर रास्ता रोको आंदोलन केले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे पुढील हप्ते न मिळाल्याने बांधकाम रखडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.


सरकारने नवीन घरकुल मंजूर केल्याने अनेकांनी आपली जुनी घरे मोडून बांधकामास सुरुवात केली. मात्र, अनुदानाचा केवळ पहिला हप्ता मिळाल्याने पुढील काम थांबले आहे. परिणामी लाभार्थ्यांना भाड्याने खोली घेऊन राहावे लागत असून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी सांगितले.


ग्रामपंचायत सदस्य नीलेश राजपूत व शमीम सौदागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली. “घरकुलाचे अनुदान द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनामुळे बुलडाणा, चिखली, सैलानी, दुधा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.


बीडीओंच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे बलडाणा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सहायक लेखा अधीक्षकांची बदली झाल्याने हप्ते वितरणात विलंब झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले. नवीन अधीक्षकांची डीएससी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी हप्ते मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन प्रणालीद्वारे जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


एकूण ६३० लाभार्थ्यांना पहिला हप्ता, १४५ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता, तर ४० लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. १७ लाभार्थ्यांचे हप्ते आधार व पीएफएमएस प्रलंबित असल्यामुळे बाकी असून ते तातडीने निकाली काढून रक्कम जमा केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!