शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील व्यंकटेश नगर परिसरात शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या लेझीम सरावादरम्यान एका तरुणीचा हात धरून तिचा पाठलाग करत घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेश नगर येथील रहिवासी असलेली तरुणी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता इतर मुली व महिलांसोबत घरासमोरील रस्त्यावर लेझीमचा सराव करत होती. त्यावेळी सनी सोळंके (वय अंदाजे २१, रा. व्यंकटेश नगर) हा तेथे आला. त्याने तरुणीचा हात धरून तिच्यासोबत येण्यास सांगितले. तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करत घरात घुसून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तरुणीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील महिलांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केला व तिला आरोपीच्या तावडीतून सोडवले. यानंतर आरोपी तेथून पसार झाला. घटनेची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर संबंधित तरुणीने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ७५, ३५२, ३५१(२) व ३३३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.













