देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील देऊळगाव मही येथे विजेचा धक्का बसून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३१ जानेवारी रोजी घडली. संतोष गंगाराम आरमाळ (वय ६२, रा. शिवणी आरमाळ, ता. देऊळगाव मही) असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, छत्रपती चौक परिसरात संतोष आरमाळ यांच्या मालकीच्या जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळच्या सुमारास इमारतीवर पाणी मारत असताना घरासमोरून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या मेन लाईनच्या तारेचा नकळत संपर्क आल्याने त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. या धक्क्यामुळे ते तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना गंभीर अवस्थेत देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
कै. संतोष आरमाळ हे लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा, शिवणी आरमाळ येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते व सेवानिवृत्त झाले होते. ते जि.प. शाळा अंढेरा (सेवानगर) येथील शिक्षक हरी आरमाळ यांचे वडील होत. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.













