Advertisement Advertisement
महाराष्ट्र

बुलडाण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! काँग्रेस नगर परिसरात घरफोडी, सोन्या-पितळेचे साहित्य चोरीला….

बुलडाणा :(बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील चिखली रोडवरील काँग्रेस नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील मौल्यवान साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदीप शाळेसमोरील काँग्रेस नगर परिसरात राहणारे प्रतीक प्रदीप पवार (वय २४) हे आर.सी.पी. मेहकर पोलीस ठाण्यात कार्यरत असून, १० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता घराला कुलूप लावून ते ड्युटीसाठी मेहकर येथे रवाना झाले होते. दरम्यान, घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रतीक पवार घरी परतल्यानंतर मुख्य दरवाजा उघडताना आतून दरवाजा लावलेला असल्याचे आढळून आले. संशय आल्याने मागील बाजूची पाहणी केली असता दरवाजा तुटलेला व तेथे लोखंडी कुऱ्हाड पडलेली दिसून आली.

घराची तपासणी केल्यानंतर तांब्याची समई, पितळी समई, देवांच्या पितळी मूर्ती, लहान देवांच्या मूर्ती, तांबे-पितळेची भांडी तसेच अंदाजे ५ हजार रुपये किमतीची सोन्याची कानातील बाळी असा एकूण सुमारे ७,५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ. सुभाष म्हस्के, बुलडाणा शहर पोलीस ठाणे करीत आहेत. परिसरात वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!