बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा तालुक्यातील हतेडी गावात २२ जून २०२५ रोजी शेतात पेरणीसाठी निघालेल्या पती-पत्नीवर रॉडने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पती अरुण निकाळजे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ २६ जून रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
“साहेब, हा घ्या पुरावा!” ट्रॅफिक पोलिसांच्या संरक्षणातच चिखलीत वाळू माफियांना मोकळा राज?
या घटनेचा तपशील असा आहे की, अरुण निकाळजे आणि त्यांच्या पत्नी भारती निकाळजे हे दोघे शेतात पेरणीच्या कामासाठी निघाले होते. गावातील बसथांब्यावर ते थांबले असताना सुभाष निकाळजे, आतिश निकाळजे आणि रतिष निकाळजे या तिघांनी अचानक त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात अरुण निकाळजे यांना गंभीर दुखापत झाली, तर भारती निकाळजे यांनाही मारहाण झाली. जखमी अवस्थेत अरुण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर पीडित दाम्पत्याने २७ जून रोजी बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.