डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) कालपासून मेहकर आणि लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून, शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अशाच या मुसळधार पावसात डोणगाव येथील पाचजण कास नदीपात्रात पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
शेलगाव देशमुख रस्त्यावर असलेल्या नदीपात्रात सकाळी शेतकामासाठी गेलेल्या या युवकांना परत येण्याचा मार्गच बंद झाला आहे.
अडकलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
गोविंद परमाळे, आकाश परमाळे, कलदीप परमाळे, अनिल परमाळे आणि ज्ञानेश्वर कहऱ्हाळे हे सर्वजण डोणगाव येथील रहिवासी आहेत.
सध्या ते सर्वजण नदीपात्रातील निंबाच्या झाडावर चढून थांबले आहेत. पुराचे पाणी वेगाने वाढत असल्याने त्यांचा जीव धोक्यात असल्याची स्थिती आहे.
घटनेची माहिती मिळताच बुलडाणा येथून बचाव पथक तातडीने रवाना झाले आहे. लवकरच बचावकार्य सुरू होणार असून गावात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.