मेरा खुर्द (अंकुश थुट्टे-बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील हायवे चौफुलीवर सोमवार, २३ जून २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एका ४२ वर्षीय व्यक्तीचा चाकूने गळा कापून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा आरोपी फरार आहे. मृतकाचे नाव भरत विरशीद नाडे (वय अंदाजे ४२, रा. नांद्राकोळी, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक भरत नाडे चिखलीहून देऊळगाव राजाकडे जाणाऱ्या एका खासगी वाहनातून (काळीपिवळी) प्रवास करत होता. चिखली-जालना हायवेवरील मेरा खुर्द चौफुलीवर वाहन थांबताच दोन आरोपींनी त्याला गाडीतून खाली उतरवलं. काही क्षणांतच त्यांच्यात वाद झाला आणि आरोपींनी भरतवर चाकूने हल्ला केला. झटापटीत तिघेही रस्त्यावरील एका फळविक्रीच्या स्टॉलवर कोसळले. यावेळी एका आरोपीने चाकूने भरतचा गळा कापला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.



घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना सादर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि एका संशयिताला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (रा. वरुड, ता. जाफराबाद, जि. जालना) असं आहे. दुसरा आरोपी अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक आणि आरोपी हे साले-मेव्हणे होते. आरोपी ज्ञानेश्वरने पोलिसांना सांगितलं की, मृतक भरतकडे त्याचे १० लाख रुपये थकले होते. या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याने हा खून केला. मात्र, पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
संतापजनक…! अकरा वर्षीय चिमुकलीवर अल्पवयीन नरधमाने केला अत्याचार! धाड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना…
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाचे पीएसआय राजेश बछिरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, फोटोग्राफर अनिल चित्ते यांनी पुरावे गोळा केले. तसेच, दुय्यम ठाणेदार सुरेश जारवाल, बिट जमदार भरत पोफळे, सिद्धार्थ सोनकांबळे, किशोर जाधव यांनी तपासात सहभाग घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
या घटनेत स्थानिक फळविक्रेता अनिस खान यांच्या स्टॉलचं ८ ते १० हजार रुपयांचं नुकसान झालं. घटनास्थळी बाळू वराडे, सर्जेराव गवई, सुनील गवई, शेख अन्सार, राशिद खान यांनी पोलिसांना मदत केली. या खुनामुळे मेरा खुर्द परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करत असून हत्येच्या पार्श्वभूमीचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.
2 thoughts on “EXCLUSIVE: भरदिवसा चाकूने गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या; एक आरोपी अटकेत, एक फरार”