अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कॉलेजला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडलेली १८ वर्षीय विद्यार्थिनी सायंकाळपर्यंत घरी परतलीच नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. मुलीच्या वडिलांनी नातेवाइकांकडे आणि परिसरात शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलीला पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करीत त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.
अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलिस ठाण्यात हद्दीत परिसरातील एका गावातील ही विद्यार्थिनी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास चिखली येथे कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघाली होती. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली. वडिलांनी नातेवाइकांकडे तसेच आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.
बेपत्ता विद्यार्थिनीचे वय १८ वर्षे असून, तिची उंची अंदाजे ५ फूट, रंग गोरा आणि केस लांब आहेत. घरातून निघताना तिने निळ्या रंगाची जीन्स, काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. तसेच पायात बूट होते. या वर्णनाची विद्यार्थिनी कोणाला आढळल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणी विद्यार्थिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.













