Advertisement Advertisement

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन तरुणींवर हल्ला; अपहरणाचा प्रयत्न फसला! एकीने प्रतिकार करीत आरोपीच्या तावडीतून सोडवली सुटका, दुसरीला फरफटत नेण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही फुटेजवरून ओळख पटताच आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

पिंपळगाव काळे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींवर एका युवकाने अचानक हल्ला करून अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २६ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सकाळी ५ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास घडली. रोशनी प्रल्हाद अस्वार (वय १८) आणि मीना गजानन हिस्सल (वय १८) अशी या तरुणींची नावे आहेत. दोघींनीही प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेने पिंपळगाव काळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी आणि मीना या दोघी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना अचानक एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी रोशनी हिने धाडस दाखवत प्रतिकार केला आणि आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेत घर गाठले. मात्र, आरोपीने मीना हिला पकडून मारहाण करीत फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान, आरोपी अडखळून पडल्याने मीनालाही त्याच्या तावडीतून सुटून घरी पोहोचता आले.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गजानन हिस्सल यांनी सकाळी सहा वाजताच पोलिसांत तक्रार दिली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. मात्र, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली. आरोपी सुनील असल्याचे सांगण्यात आले असून, दुसरीकडे विष्णू बोदडे (वय ४०) याला अटक करण्यात आल्याचा उल्लेखही प्राप्त माहितीत आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेच्या दोन ते तीन दिवस आधीच संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती शांतता भंग करणे, नागरिकांना मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे तसेच अंगविक्षेप करण्याचे प्रकार करीत असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, त्यावर वेळीच कारवाई झाली नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. आधीच योग्य ती कारवाई झाली असती तर हा प्रकार टाळता आला असता, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दोन तरुणींवर झालेल्या या हल्ल्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!