Advertisement Advertisement

लग्नात ३१ लाख रुपये अन् चारचाकी दिली, तरी हुंड्याचा लोभ सुटेना!पत्नीच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री १० लाखांची मागणी केल्याचा आरोप; मेहकर न्यायालयाने पतीचा जामीन अर्ज फेटाळला…

हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नात तब्बल ३१ लाख रुपये रोख आणि चारचाकी गाडी दिल्यानंतरही हुंड्याची मागणी थांबली नाही. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी पतीला न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. पत्नीच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री १० लाख रुपयांची मागणी करून पैसे आणले नाहीत तर गळफास घेण्यास सांगितल्याचा आरोप प्रथमदर्शनी महत्त्वाचा मानत मेहकर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी पतीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.

गणेश रामेश्वर मेरत असे जामीन नाकारण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २३ जून २०२६ रोजी मेहकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ८० (२), ८५ सह ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रतन श्रीकिसन पागोरे हे सेवानिवृत्त शिक्षक असून, त्यांची मुलगी वैशाली (वैष्णवी) हिचा विवाह २२ एप्रिल २०२२ रोजी गणेश मेरत याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी ३१ लाख रुपये रोख हुंडा म्हणून दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. एवढेच नव्हे तर चारचाकी वाहनाची मागणी झाल्याने स्विफ्ट कार घेण्यात आली. या वाहनाचे डाउन पेमेंट आणि हप्तेही फिर्यादीने भरल्याचे न्यायालयीन आदेशात नमूद आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनूज रामकृष्ण कांबळे यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. विवाहानंतर सात वर्षांच्या आत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून, मृत्यूपूर्वी अगदी जवळच्या काळात १० लाख रुपयांची मागणी आणि छळ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. हुंड्यासाठी सातत्याने छळ केल्याचे आरोप, आर्थिक व्यवहारांचे दस्तऐवज आणि मृत्यूपूर्वी विवाहितेने वडिलांना सांगितलेली माहिती या बाबींचाही न्यायालयाने विचार केला.

भारतीय साक्ष्य अधिनियमाच्या कलम ११८ अंतर्गत वैधानिक अनुमान लागू होण्याच्या मुद्द्याचाही न्यायालयाने विचार केला. आरोपीविरुद्ध खटला चालविण्यासाठी प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने नियमित जामीन अर्ज क्रमांक २५१/२०२६ फेटाळला. सरकारी पक्षातर्फे अॅड. खात्री साहेब, तर फिर्यादीतर्फे अॅड. निकस यांनी बाजू मांडली.

दरम्यान, या प्रकरणात अद्याप आरोपीची दोषसिद्धी झालेली नाही. न्यायालयाने केवळ नियमित जामीन अर्ज फेटाळला असून, खटल्यातील अंतिम सत्य आणि दोषनिश्चिती न्यायप्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!