नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घराचे बांधकाम सुरू असतानाच काळाने घाला घातला. कुलरच्या वायरमधून जोरदार विजेचा धक्का लागल्याने ४६ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नांदुरा तालुक्यातील पोटळी येथे २३ नोव्हेंबर रोजी घडली. लताबाई दिलीप लाहुडकर (वय ४६, रा. पोटळी, ता. नांदुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे पोटळी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लताबाई लाहुडकर यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्या घरात असताना कुलरच्या वायरचा अचानक त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. नातेवाईकांनी वेळ न दवडता त्यांना तातडीने नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल शिंदे यांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. महिलेच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे परिचर प्रफुल्ल वसंता वानखडे (वय ३१) यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एमएलसी मेमो नांदुरा पोलीस ठाण्यात सादर केला. त्यावरून पोलिसांनी मर्ग क्रमांक ५८/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार बिट पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पुढील तपास करीत आहेत.













