देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पवन अंबादास इंगळे (वय २२, रा. वरुड, ता. जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन इंगळे हा ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री एमएच २८ बीवाय ०३४६ क्रमांकाच्या स्कूटीने उंबरखेड फाट्याकडून पेट्रोल भरून देऊळगाव राजा येथे येत होता. यावेळी ग्रामीण रुग्णालयासमोर अचानक गाय रस्त्यावर आडवी आली. त्यामुळे दुचाकीवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर पवनला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. तरुण वयात झालेल्या या मृत्यूमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी मृताचे वडील अंबादास दिंगबर इंगळे (वय ४४, व्यवसाय शेती, रा. वरुड, पोस्ट नाढा, ता. जि. जालना) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तोंडी फिर्याद दिली. विशेष म्हणजे, अपघात ६ नोव्हेंबर रोजी घडला असताना, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता पोलिसांत नोंद करण्यात आली. याप्रकरणी कायम मर्ग क्रमांक ५१/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, रस्त्यावर मोकाट जनावरांचा वाढता वावर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून, या घटनेने मोकाट जनावरांच्या बंदोबस्ताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.













