मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आई-वडील शेतात मजुरीसाठी गेलेले आणि घरात कुणीच नसल्याची संधी साधत २२ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना मोताळा तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तरुणीच्या कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरू आहे.
याबाबत बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची पत्नी हे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात मजुरीच्या कामासाठी गेले होते. यावेळी त्यांची २२ वर्षीय मुलगी घरी एकटीच होती.
दरम्यान, घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून किंवा पळवून नेल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. आई-वडील घरी परतल्यानंतर मुलगी दिसून न आल्याने त्यांनी नातेवाईक तसेच परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
अखेर याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.












