चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा काटा काढल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गोपाल उर्फ संजय मंजुळ पवार खून प्रकरणातील आरोपी पत्नी कोमल भोसले आणि तिचा प्रियकर अजय उर्फ गोट्या विजय पवार यांना अमडापूर पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी चिखली न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
चिखली तालुक्यातील महीमळ शिवारात कव्हळा ते महीमळ जाणाऱ्या गाडरस्त्यावर १५ नोव्हेंबर रोजी गोपाल उर्फ संजय पवार याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचा तपास सुरू करताच अमडापूर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आणि संशयाच्या आधारे मृताची पत्नी कोमल भोसले व तिचा प्रियकर अजय उर्फ गोट्या पवार या दोघांना काही तासांतच अटक केली.
दरम्यान, या खून प्रकरणात वापरण्यात आलेले हत्यार अद्याप हस्तगत करायचे असून, ते नेमके कुठे लपविण्यात आले किंवा त्याची विल्हेवाट लावण्यात आली का, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच या गुन्ह्यामागे नेमका काय कट होता, त्यात आणखी कोणी सहभागी होते का आणि आरोपींना बाहेरून कोणी मदत केली का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.
दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या खुनामागील संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी अमडापूर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अमडापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप पुढील तपास करीत आहेत.













