बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : मलकापूरला जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसलेली २० वर्षीय तरुणी घरी पोहोचलीच नाही. मामाच्या गावाहून परतताना वाटेतच ती बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तरुणीचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. मोबाइलही बंद येत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून, अखेर तरुणीच्या आईने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी १३ नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या मामाच्या गावी भाऊबीज सणासाठी गेली होती. सण आटोपल्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी दुपारी मामाच्या कुटुंबीयांनी तिला बुलढाण्याहून मलकापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसवून दिले. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी पोहोचली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे समोर आले.
त्यानंतर नातेवाइकांनी विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. परिचितांकडे चौकशी केली, मात्र कुठूनही तिच्याबाबत माहिती मिळाली नाही. एसटी बसमध्ये बसल्यानंतर तरुणी नेमकी कुठे गेली, ती घरी का पोहोचली नाही, असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसमोर उभे राहिले आहेत.
अखेर १६ नोव्हेंबर रोजी तरुणीच्या आईने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, बेपत्ता तरुणीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.












