Advertisement Advertisement

दोन महिन्यांपूर्वी घरात पाळणा हलला, पण दोन महिन्यांतच बापाचं छत्र हरपलं! पण वैभवच्या दुर्दैवी मृत्यूने हिवरखेड गाव सुन्न!

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथे २६ वर्षीय युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. वैभव विठोबा भुसारी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी घरात चिमुकल्या बाळाचे आगमन झाले होते. संसाराची नवी सुरुवात होत असतानाच काळाने घाला घातल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वैभव हा शेती व्यवसाय करत होता. मात्र, शेतीतील अनिश्चितता, दुष्काळी परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि कर्जाचा वाढता ताण अशा संकटांचा सामना त्याला करावा लागत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याच विवंचनेतून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची गावात चर्चा आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. याबाबत तपासातूनच वस्तुस्थिती समोर येणार आहे.

अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले!

या घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक बाब म्हणजे वैभवच्या पश्चात अवघ्या दोन महिन्यांचा देवानंद नावाचा मुलगा आहे. नुकताच सुरू झालेला संसार आणि घरात आलेला चिमुकला आनंद यावर नियतीने एका क्षणात विरजण घातले. ज्या बाळाला वडिलांच्या प्रेमाची ऊब मिळायला हवी होती, त्या बाळाच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचे हरपले आहे.

वैभवच्या जाण्याने तरुण पत्नी, आई-वडील, वृद्ध आजी-आजोबा आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या २६ वर्षांच्या तरुण शेतकऱ्याच्या दुर्दैवी निधनाने हिवरखेड पूर्णा गावात शोककळा पसरली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!