चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अनैतिक प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना चिखली तालुक्यातील महीमळ शिवारात उघडकीस आली आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी कव्हळा ते महीमळ गाडरस्त्यावर ही घटना घडली. गोपाल उर्फ संजय मंजुळ पवार (रा. टाकरखेड हेलगा, ता. चिखली) असे मृत पतीचे नाव असून, या प्रकरणी त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर अजय उर्फ गोट्या विजय पवार (दोघे रा. वर्दडा, ता. चिखली) यांना अमडापूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गोपाल हा आपल्या पत्नीसोबत दुचाकीने पांढरदेव येथे मेहुणीला कपडे देण्यासाठी घराबाहेर पडला होता. दरम्यान, पत्नी आणि अजय उर्फ गोट्या यांच्यात प्रेमसंबंध होते. या संबंधात पती अडसर ठरत असल्याने दोघांनी त्याला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यानुसार कव्हळा ते महीमळ गाडरस्त्यावर गोपाल याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने गोपालचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर पत्नीनेच नातेवाईकांना केला फोन!
या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, पतीचा खून झाल्यानंतर पत्नीनेच दुपारी साडेएक वाजेच्या सुमारास मृताचा चुलत भाऊ मनोज आसाराम पवार याला फोन केला. आपण आणि अजय उर्फ गोट्या यांनी मिळून गोपालवर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची माहिती तिने फोनवर दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच मृतदेह कव्हळा ते महीमळ गाडरस्त्यावर पडून असल्याचेही सांगितले. ही माहिती मिळताच मृताचा लहान भाऊ ओम मंजुळ पवार (वय २१), चुलत भाऊ करण पवार आणि मनोज पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गोपाल मृतावस्थेत आढळून आला.
अमडापूर पोलिसांची वेगवान कारवाई; काही तासांत दोघे जेरबंद!
या प्रकरणी ओम मंजुळ पवार याने दिलेल्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिचा प्रियकर अजय उर्फ गोट्या विजय पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५१(२) आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अजय पवार याला अकोला येथून, तर महिला आरोपीला लाखनवाडा येथून ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात अमडापूर पोलिसांना यश आले. या वेगवान कारवाईचे परिसरातून कौतुक होत असून, पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.













