शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका २२ वर्षीय नर्सचा पाठलाग करून तिला अश्लील इशारे दिल्याचा, तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. महादेव मुरलीधर अवचार याने वाईट उद्देशाने महिलेचा पाठलाग केला आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे इशारे देऊन विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय, महादेव मुरलीधर अवचार, वैभव मुरलीधर अवचार आणि संदीप श्रीकृष्ण अवचार या तिघांनी पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने २३ ऑक्टोबर रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.












