मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका युवा व्यापाऱ्यावर अॅसिड फेकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. राकेश मोहनदास तलरेजा (वय ४५) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश तलरेजा यांच्या घराजवळ, सुनिल टॉकीज परिसरात दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्लेखोरांनी तलरेजा यांच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अॅसिड फेकले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी संदीप गोकुलदास तलरेजा (वय ३०, रा. छोटी सिंधी कॉलनी) यांनी मलकापूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी अप. क्र. ८११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२४(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या गंभीर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील करीत आहेत. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.













