डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शिवारात शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १८ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. संतोष संजय चंदनशिव (रा. अंजनी बुद्रुक, ता. मेहकर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजनी बुद्रुक येथील संजय नामदेव लाड यांच्या शेतात संतोष चंदनशिव हा काम करत होता. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी शेतातील विद्युत खांबाचा त्याला शॉक लागला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने संतोषचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती संतोषचा चुलत भाऊ अरविंद दिगंबर चंदनशिव यांनी २१ ऑक्टोबर रोजी डोणगाव पोलिसांना तोंडी दिली. या माहितीच्या आधारे डोणगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोषच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नसल्याचेही माहिती देताना नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संजय घिके करीत आहेत.














