अंढेरा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. तालुक्यातील रोहडा येथे विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. या वादातून दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, अंढेरा पोलिसांनी विनयभंग, मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याच्या आरोपांवरून संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
अंढेरा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार बिजूबाई किसन शिंगणे (वय ५५, रा. रोहडा) यांनी दिली आहे. त्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेल्या असताना त्यांची नातवंडे तेथे खेळत होती. यावेळी निशादबी भिकन शेख यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर भिकन शेख यांनी बिजूबाई शिंगणे यांचा विनयभंग करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी निशादबी भिकन शेख व भिकन शेख, दोघेही रा. रोहडा, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या गटाचीही पोलिसांत धाव….
दरम्यान, याच घटनेप्रकरणी निशादबी शेख भिकन (वय ५०, रा. रोहडा) यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली. गावातील विहिरीवर मोटार सुरू करून सिमेंट रोडच्या कामासाठी पाणी देण्याचे काम सुरू होते. त्यावेळी कैलास किसन शिंगणे हे दुचाकीवरून जात असताना त्यांना नळ व सोलवरून वाहन नेऊ नका, असे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी दुचाकी नळ व सोलवरून नेल्याने सोल मोटारीला अडकून मोटार विहिरीबाहेर आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर निशादबी यांच्या पतीने कैलास शिंगणे यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पतीचा गळा दाबून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पतीला सोडवण्यासाठी गेलेल्या निशादबी यांना वाईट उद्देशाने जवळ ओढून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे तसेच दुचाकीने उडवून देण्याची, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आणि शेतातील सोयाबीनची सुडी पेटवून देण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी कैलास किसन शिंगणे, रा. रोहडा, यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ७४, ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही प्रकरणांचा तपास बिट जमादार पोहेकॉ भरत पोफळे करीत आहेत.














