Advertisement Advertisement

केमिकल अंगावर उडालं अन् तरुणाचा जीव गेला! बॅझो केमिकल कंपनीतील दुर्दैवी घटना; उपचारादरम्यान ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दसरखेड एमआयडीसी परिसरातील बॅझो केमिकल कंपनीत काम करत असताना अंगावर केमिकल उडाल्याने ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ललित महादेव वाघ (वय ३२, रा. चाळीसबिघा परिसर, मलकापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ललित वाघ हे बॅझो केमिकल कंपनीत काम करत असताना त्यांच्या अंगावर हॉल्टमधून केमिकल उडाले. या घटनेनंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र काही वेळातच त्यांची प्रकृती गंभीर झाली. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक नमुने आणि माहिती संकलित केली आहे. ललित वाघ यांच्या अंगावर नेमके कोणते केमिकल उडाले, त्याचा किती प्रमाणात संपर्क झाला आणि त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मलकापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!