खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेशपूर येथील शिराळा फाट्यावर हातात तलवार घेऊन आरडाओरड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नतेश रमेश खरात (रा. गणेशपूर, ता. खामगाव) याच्याविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी ३० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अक्षय जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, गणेशपूर येथून शिराळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिराळा फाट्यावर एक व्यक्ती हातात तलवार घेऊन आरडाओरड करीत आहे. या माहितीच्या आधारे ठाणेदार संदीप पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस कर्मचारी विलास साखरे आणि महेंद्र नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नतेश खरात हा हातात तलवार घेऊन उभा असल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांना पाहताच नतेश खरात याने तलवार जागेवर फेकून शिराळा रोडच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला; मात्र तो शेतरस्त्याने पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळावरून तलवार जप्त केली. या तलवारीची एकूण लांबी ३३ इंच असून, पात्याची लांबी २९ इंच आणि लोखंडी मुठीची लांबी ४ इंच आहे. जप्त तलवारीची अंदाजे किंमत ५०० रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगण्यास बंदी घातलेली असतानाही तलवार बाळगल्याप्रकरणी नतेश खरात याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अन्वये हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
















