Advertisement Advertisement

विहिरीवरील इंजिन सुरू केल्याच्या कारणावरून वाद! वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मारहाण; एकाने दगड मारला, तर दुसऱ्याने काठीने हल्ला केल्याचा आरोप!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विहिरीवरील इंजिन सुरू करून दुसऱ्याच्या शेतात पाणी घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात वृद्ध शेतकरी आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून जखमी केल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी बारलिंगा येथे घडली. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक विश्राम वाघमारे (वय ६८, रा. बारलिंगा) हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी राजेंद्र सुभाष वाघमारे आणि रुक्मिना सुभाष वाघमारे यांनी अशोक वाघमारे यांच्या मालकीच्या विहिरीवरील इंजिन सुरू करून पाईपद्वारे स्वतःच्या शेतात पाणी घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यावरून अशोक वाघमारे यांच्या पत्नीने आरोपींना, “आमचे इंजिन का सुरू केले?” अशी विचारणा केली. त्यातून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. हा वाद सोडविण्यासाठी अशोक वाघमारे पुढे आले असता, आरोपी क्रमांक एकने त्यांच्या हातावर दगड मारून त्यांना जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या हातावर काठीने मारहाण करून त्यांनाही जखमी करण्यात आले. याशिवाय आरोपी क्रमांक दोनने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र सुभाष वाघमारे आणि रुक्मिना सुभाष वाघमारे (रा. बारलिंगा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!