Advertisement Advertisement

बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; सोयाबीन सोंगत असताना अचानक झडप! थळ शिवारातील घटना; शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने महिलेचे प्राण वाचले, परिसरात दहशत…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील थळ शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम सुरू असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सुनीता प्रकाश कुसळकर या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर थळ परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

थळ शिवारातील शेतात सोयाबीन सोंगणीचे काम सुरू होते. यावेळी सुनीता कुसळकर या शेतात कामात व्यस्त असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या नख्यांमुळे त्यांच्या पाठीत आणि चेहऱ्यावर दुखापत झाली. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या सुनीता यांनी आरडाओरड केली.

महिलेचा आवाज ऐकताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकरी जमा झाल्याने बिबट्या तेथून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर जखमी सुनीता कुसळकर यांना तातडीने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे वनपाल प्रशांत जाधव आणि वनरक्षक लक्ष्मी जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली व घटनेची माहिती जाणून घेतली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे थळ शिवारात घबराट पसरली असून, शेतात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेऊन शेतकऱ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!