Advertisement Advertisement

अडीच एकर शेती… डोक्यावर कर्जाचा डोंगर! पावसानंही साथ सोडली; रुईखेड मायंबाच्या शेतकऱ्याचं दुःखद निधन…

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): सततचे कर्ज, नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी पंजाबराव रामेकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे रामेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पंजाबराव रामेकर यांच्याकडे अवघी अडीच एकर शेती होती. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने ते पत्नी व मुलासह इतरांच्या शेतात मजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवत होते. त्यांनी एचडीएफसी बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्रच्या चांडोळ शाखेतून पीक कर्ज घेतले होते. मात्र, अपेक्षित उत्पन्न न झाल्याने कर्जाचा बोजा वाढत गेला.

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने प्रदीर्घ खंड दिल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या रामेकर यांच्या संकटात आणखी भर पडली. कर्जाची परतफेड कशी करावी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत ते होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कर्जमाफीच्या लाभापासूनही आपण वंचित राहिल्याने ते तणावात असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले.

पंजाबराव रामेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबाचा आधार हरपला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!