खडकपूर्णाचं पाणी तळाला! अवघा ७ टक्के साठा; रब्बी अन् पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली….आता रब्बी कशी करायची रं? धरणांत पाणीच कमी… बुलढाण्यात शेतकऱ्यांसमोर नवं संकट….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदा पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याने खरीप पिकांची मोठी वाताहत झाली असतानाच आता भविष्यातील पाणीटंचाईचे संकटही गडद होताना दिसत आहे. वेळेवर आणि पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पेयजलासोबतच रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जलसंपदा विभागाने २४ सप्टेंबर रोजी सकाळी नोंदविलेल्या जलसाठ्याच्या अहवालातून जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये खडकपूर्णाची अवस्था चिंताजनक….
बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा, पेनटाकळी आणि खडकपूर्णा हे तीन मोठे जलसंपदा प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात ८१.४३ टक्के, तर पेनटाकळी प्रकल्पात ८१.८३ टक्के जलसाठा आहे. मात्र, खडकपूर्णा प्रकल्पाची स्थिती अत्यंत चिंताजनक असून येथे केवळ ७.४४ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
खडकपूर्णा प्रकल्पावर अवलंबून असलेले कालवे, उपसा सिंचन योजना तसेच विविध पेयजल पुरवठा योजनांसमोर त्यामुळे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. आगामी काळात पाण्याची मागणी वाढल्यास या अत्यल्प साठ्याचा थेट परिणाम सिंचन आणि पिण्याच्या पाण्यावर होऊ शकतो.
सात मध्यम प्रकल्पांपैकी दोन प्रकल्पांची पाणीपातळी खाली….
जिल्ह्यात ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा आणि उतावळी असे सात मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये पलढग प्रकल्पात १०० टक्के, ज्ञानगंगा ९८.८५ टक्के, उतावळी ९४.५९ टक्के, कोराडी ९३.५८ टक्के आणि मस प्रकल्पात ६७.६९ टक्के जलसाठा आहे.
मात्र, मन प्रकल्पात केवळ ४४.२६ टक्के, तर तोरणा प्रकल्पात ३३.९७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांची पाणीपातळी चिंताजनक मानली जात आहे.
४२ लघुपाटबंधारे प्रकल्पांत सरासरी ५६.१८ टक्के साठा….
जिल्ह्यातील ४२ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ५६.१८ टक्केच जलसाठा आहे. यंदाच्या पावसाची स्थिती पाहता हा साठा आगामी काळासाठी कितपत पुरेसा ठरेल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी आणि ग्रामीण भागातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रकल्प क्षेत्रातही पावसाची मोठी तूट…..
जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार यावर्षी विविध प्रकल्प क्षेत्रात झालेला पाऊसही समाधानकारक नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. नळगंगा येथे ३२० मिमी, खडकपूर्णा ३४८ मिमी, पेनटाकळी ६५६ मिमी, पलढग २९१ मिमी, ज्ञानगंगा ३७७ मिमी, कोराडी ६९३ मिमी, उतावळी ३२१ मिमी, मस ३४५ मिमी, तोरणा २५८ मिमी आणि मन प्रकल्प क्षेत्रात अवघा २५८ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे.
खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हातची पिके करपली आहेत. आता धरणे आणि पाटबंधारे प्रकल्पांमधील घटता जलसाठा पाहता रब्बीच्या पिकांना पाणी मिळणार का, जनावरांची तहान कशी भागणार आणि आगामी काळात पेयजलाचा प्रश्न किती गंभीर होणार, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.














